प्रकाशन दिनांक: 27-08-2025
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पुढे वाटचाल करत आहे आणि संपूर्ण गुजरात राज्यात आठ आधुनिक स्थानके उभारली जात असल्याने, या राज्यात एक मोठा कायापालट घडताना दिसत आहे. साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलिमोरा आणि वापी येथील स्थानकांचे सांगाडा उभारणीचे (structural) काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे; आता या ठिकाणी अंतर्गत सजावट (इंटेरियर्स), छताचे काम आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांची उभारणी यांसारखी अंतिम टप्प्यातील कामे प्रगतीपथावर आहेत.
एकदा ही स्थानके पूर्ण झाली की, ती केवळ गाड्या पकडण्याची ठिकाणे म्हणून मर्यादित राहणार नाहीत, तर जागतिक दर्जाचा प्रवास, आराम आणि सोयीसुविधांची प्रतीके बनतील.
प्रवाशांच्या आरामाचा विचार करून, प्रत्येक स्थानकाची रचना अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे; जेणेकरून ते स्थानक ज्या शहरात वसलेले आहे, त्या शहराची सांस्कृतिक ओळख त्या रचनेतून प्रतिबिंबित होईल. मनाला शांतता देणारी अंतर्गत सजावट आणि कलात्मक बाह्य रचनांपासून ते नैसर्गिक प्रकाश आणि हवेशीर जागांपर्यंत—एक शांत आणि सुखद प्रवासाचा अनुभव निर्माण करण्यावर या प्रकल्पात विशेष भर देण्यात आला आहे.
स्थानकांच्या रचनेत 'शाश्वतता' (Sustainability) या तत्त्वाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. स्वच्छ ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी काही स्थानकांवर सौर पॅनेल बसवले जात आहेत, तर 'स्कायलाईट्स' (छतावरील खिडक्या) आणि मोकळ्या जागांमुळे दिवसाच्या वेळी कृत्रिम प्रकाशाची गरज कमी होईल. प्लॅटफॉर्मच्या परिसरातही भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा उपलब्ध असेल.
स्थानकाच्या संपूर्ण परिसरात हिरवेगार आणि आल्हाददायक वातावरण निर्माण करण्यासाठी विविध प्रकारची झाडे आणि रोपे लावली जात आहेत. भूजल पुनर्भरण विहिरींच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठवून (Rainwater Harvesting) त्याचा वापर करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STPs) उभारले जात आहेत. स्थानकाच्या उभारणीमध्ये रंग, पॅनेल आणि फरशा यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे ही स्थानके केवळ आधुनिकच नव्हे, तर पर्यावरणाप्रती जबाबदारही ठरतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी, प्रत्येक स्थानकावर अनेक लिफ्ट आणि सरकते जिने (Escalators) बसवले जात आहेत; जेणेकरून स्थानकाच्या विविध स्तरांवर सहजपणे वावरणे सर्वांसाठी—विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी—सुलभ होईल. प्रवाशांना 'कॉन्कोर्स' (प्रवेश कक्ष), प्लॅटफॉर्म आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर सहजपणे मार्गदर्शन करण्यासाठी स्पष्ट फलक (Signages) लावण्यात येत आहेत; यामध्ये माहिती कक्ष (Kiosks) आणि सार्वजनिक घोषणा प्रणालीचाही समावेश आहे.
प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि आनंददायी बनवण्यासाठी, स्थानकांवर आरामदायी बैठक व्यवस्था असलेली प्रशस्त प्रतीक्षा दालने, बिझनेस क्लास लाउंज, शिशुगृह आणि बालसंगोपन सुविधा उपलब्ध असतील; याव्यतिरिक्त खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खरेदीसाठीची दुकाने (Retail counters) आणि इतर प्रवासी सेवाही येथे उपलब्ध असतील.
अहमदाबाद, वडोदरा, साबरमती आणि सुरत येथील स्थानकांचा विकास 'बहु-माध्यमी परिवहन केंद्र' (Multimodal Transport Hubs) म्हणून केला जात आहे.
याचा अर्थ असा की, प्रवासी बुलेट ट्रेन, भारतीय रेल्वे, मेट्रो गाड्या, बस, टॅक्सी, रिक्षा आणि इतर स्थानिक वाहतूक साधनांमध्ये सहजपणे बदल (switch) करू शकतील. अशा प्रकारच्या सुरळीत एकात्मतेमुळे एका वाहनातून दुसऱ्या वाहनात जाण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल, ज्यामुळे सर्वांसाठीच प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर बनेल. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वच स्थानकांवर वाहनतळांची (पार्किंगची) व्यवस्था देखील विकसित केली जात आहे.
प्रत्येक बुलेट ट्रेन स्थानकाचा विकास केवळ एक 'वाहतूक केंद्र' म्हणून न करता, त्याहूनही अधिक काहीतरी म्हणून केला जात आहे — ते जोडणी (connectivity), शाश्वतता आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा सुरेख मेळ साधणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे, तसेच वाहतूक साधनांमधील अखंड एकात्मतेमुळे, ही स्थानके प्रवाशांच्या अनुभवाच्या बाबतीत नवीन मापदंड प्रस्थापित करतील.
संबंधित प्रतिमा