प्रकाशन दिनांक: 13-05-2024
महाराष्ट्रामध्ये बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या बांधकाम स्थळांवर आणि त्याच्या आजूबाजूला, नागरी संरचना आणि सेवा सुविधांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत संवेदनशील भूतांत्रिक निरीक्षण उपकरणे तैनात केली जात आहेत.
बांधकाम स्थळांवर आणि त्याच्या आजूबाजूला झुकणे, खचणे, कंपने, भेगा आणि विरूपण यांचे निरीक्षण करण्यासाठी इनक्लिनोमीटर, व्हायब्रेशन मॉनिटर, ग्राउंड सेटलमेंट मार्कर, टिल्ट मीटर इत्यादी विविध प्रकारची भूतांत्रिक उपकरणे स्थापित करण्यात आली आहेत. उत्खनन आणि बोगदा खोदण्यासारख्या सुरू असलेल्या भूमिगत कामांना किंवा बांधकाम स्थळाच्या सभोवतालच्या संरचनांना कोणताही धोका नाही, याची खात्री करण्यात ही उपकरणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
भू-तांत्रिक उपकरणे त्यांच्या संबंधित मॉड्यूल्सशी जोडलेली असतात, जेणेकरून कामांची नोंद आणि निरीक्षण करता येईल.
यामुळे संभाव्य धोके वेळेवर ओळखता येतात आणि ते कमी करण्यासाठी वेळेवर उपाययोजना करणे शक्य होते. बांधकाम स्थळांवर आणि त्याच्या आसपास ध्वनी आणि वायू प्रदूषण स्वीकारार्ह मर्यादेत राहील याची खात्री करण्यासाठी, धूळ आणि ध्वनी मापक यंत्रे देखील बसवली जात आहेत. महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या २१ किमी लांबीच्या भूमिगत भागाचे बांधकाम सुरू आहे. या कामांमध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुमारे १ किमी लांब आणि ३२ मीटर खोल (सुमारे १० मजली उलटी इमारत) भूमिगत बुलेट ट्रेन स्टेशनसाठी उत्खनन, तसेच बोगदा खोदण्याच्या कामासाठी शाफ्ट आणि पोर्टल्सचे बांधकाम यांचा समावेश आहे. १६ किमी लांबीच्या बोगदा खोदण्याच्या कामासाठी तीन मेगा टनेल बोरिंग मशीन्स (टीबीएम) तैनात केल्या जातील, ज्यामध्ये ७ किमी समुद्राखालच्या बोगद्याचा समावेश आहे आणि उर्वरित ५ किमीचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड वापरून तयार केला जाईल. बोगद्याची खोली २५ मीटर ते ५७ मीटर पर्यंत असेल. टनेल बोरिंग मशीन खाली उतरवण्यासाठी तीन शाफ्ट, एक एडीआयटी (ADIT) आणि एक पोर्टल बांधले जात आहे.
अशा भूमिगत महा-रचनांच्या बांधकामासाठी बांधकाम स्थळांची, जमिनीवरील तसेच जमिनीखालील सभोवतालच्या संरचनांची सुरक्षितता आणि परिसरातील रहिवाशांना कमीत कमी गैरसोय किंवा व्यत्यय येणे आवश्यक असते.
संबंधित प्रतिमा