प्रकाशन दिनांक: Wed, 22/07/2026 - 17:37
508 किमी लांबीच्या मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर नागरी बांधकाम आणि रेल्वे मार्ग अंथरण्याच्या कामांना वेग येत असताना, विद्युतीकरणाच्या कामांनाही गती मिळत आहे.
भारतातील पहिली उच्च-गती रेल्वे विद्युतीकरण प्रणाली
एमएएचएसआर मार्गिकेवर प्रगत 2×25 केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणाली बसविण्यात येत आहे. ही उच्च-गती रेल्वेसाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या सर्वात अत्याधुनिक रेल्वे विद्युतीकरण तंत्रज्ञानांपैकी एक आहे.
हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच लागू करण्यात येत असून, 320 किमी/ता पर्यंत अतिउच्च वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठी आवश्यक असलेला स्थिर आणि अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ते विशेषतः विकसित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय वीज ग्रीडमधून वीजपुरवठा विशेषतः डिझाइन केलेल्या ग्रीड सबस्टेशनपर्यंत आणि त्यानंतर मार्गिकेवर धोरणात्मक ठिकाणी उभारण्यात आलेल्या 14 ट्रॅक्शन सबस्टेशनपर्यंत पोहोचविला जाईल. यापैकी (5) ट्रॅक्शन सबस्टेशन महाराष्ट्रात (मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि ठाणे डेपो) असून, उर्वरित (9) गुजरातमध्ये (वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, महेमदाबाद, अहमदाबाद आणि साबरमती डेपो) स्थित आहेत.
ही सबस्टेशने मार्गिकेच्या विविध विभागांना वीजपुरवठा करतील. त्यामुळे बुलेट ट्रेन एका विभागातून दुसऱ्या विभागात जात असताना वीजपुरवठ्यातील बदल कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीतपणे होईल आणि प्रवाशांना त्याची जाणीवही होणार नाही.
अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार बिघाड झालेल्या भागांना त्वरित विलग करण्यासाठी मार्गिकेवर 31 स्विचिंग पोस्ट्स उभारण्यात येणार आहेत.
बुलेट ट्रेनला वीजपुरवठा करण्याव्यतिरिक्त, स्थानके, सिग्नलिंग प्रणाली, देखभाल सुविधा आणि इतर कार्यात्मक पायाभूत सुविधांसाठी वीज उपलब्ध करून देण्यासाठी 16 वितरण सबस्टेशनची उभारणी करण्यात येत आहे.
ओव्हरहेड विद्युत तारांचे अचूक अभियांत्रिकीने विकसित केलेले जाळे
बुलेट ट्रेन अचूक अभियांत्रिकीने विकसित केलेल्या ओव्हरहेड विद्युत तारांच्या जाळ्यावर धावतील. या जाळ्याला जवळपास 22,000 स्टील मस्तूल आणि 25,700 पेक्षा अधिक कॅन्टिलिव्हर असेंब्लीजचा आधार असेल, जे 1,125 ट्रॅक किमी (डेपो सहित) क्षेत्रात विस्तारलेले असतील.
10.5 ते 14.5 मीटर उंचीचे हे मस्तूल — म्हणजेच साधारणपणे 3 ते 4 मजली इमारतीच्या उंचीइतके — प्रगत कंपाउंड कॅटेनरी प्रणालीला आधार देतील. ही प्रणाली भारतात प्रथमच वापरण्यात येत आहे.
320 किमी/ता पर्यंतचा वेग साध्य करण्यासाठी, या प्रणालीतील प्रत्येक तार अचूकपणे गणना केलेल्या यांत्रिक ताणासह बसविण्यात आली आहे. त्यामुळे ट्रेनचा पॅन्टोग्राफ कोणत्याही ठिणग्या, व्यत्यय किंवा वीजपुरवठ्यातील चढ-उतारांशिवाय सुरळीत आणि अखंडपणे वीज संकलित करू शकतो.
'मेक इन इंडिया'ला मोठी चालना
या प्रकल्पातील सर्वात मोठ्या उपलब्धींपैकी एक म्हणजे महत्त्वपूर्ण विद्युत पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर स्वदेशीकरण करण्यात आले आहे.
उच्च-गती विद्युतीकरण प्रणालीतील अनेक प्रमुख घटकांचे उत्पादन आता भारतातच केले जात आहे. यामध्ये सर्व प्रमुख ट्रान्सफॉर्मर, ओएचई मस्तूलांवर बसविण्यात येणारे क्रॉस आर्म्स तसेच ओव्हरहेड प्रणालीच्या वरच्या विद्युत जाळ्याचा भाग असलेल्या ग्राउंड वायर, प्रोटेक्शन वायर आणि फीडर वायर यांचा समावेश आहे.
याशिवाय, ट्रॅक्शन पॉवर सप्लाय प्रणालीशी संबंधित मोठ्या संख्येने घटक, वितरण पॉवर प्रणालीतील इतर उपकरणे आणि इलेक्ट्रो-मेकॅनिकल (ईअँडएम) कामांसाठी लागणारे साहित्य देखील देशांतर्गत उत्पादित केले जात आहे.
हे प्रगत उच्च-गती रेल्वे तंत्रज्ञान भारतीय उद्योग क्षेत्रात हस्तांतरित होण्याचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. देशातच या अचूक अभियांत्रिकीने विकसित घटकांचे उत्पादन केल्यामुळे भारताची औद्योगिक क्षमता मजबूत होत आहे, विशेष कौशल्याधारित रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, आयातीवरील अवलंबित्व कमी होत आहे आणि भविष्यातील उच्च-गती रेल्वे प्रकल्पांसाठी एक सक्षम देशांतर्गत परिसंस्था विकसित होत आहे.
त्यामुळे मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प केवळ भारतात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणत नाही, तर हे तंत्रज्ञान भारतातच विकसित आणि उत्पादित करण्यासही सक्षम बनवत आहे.
भूकंपाची पूर्वसूचना प्रणाली: सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था
14 ट्रॅक्शन सबस्टेशनपैकी प्रत्येक ठिकाणी भूकंप पूर्वसूचना शोधणारी सिस्मोमीटर प्रणाली बसविण्यात येणार आहे. ही प्रणाली भूकंपीय हालचाली ओळखण्यास सक्षम असून, भूकंपाच्या परिस्थितीत काही सेकंदांत संरक्षणात्मक उपाययोजना सुरू करून ट्रेन त्वरित थांबविण्यास मदत करेल.
एकूण 28 सिस्मोमीटर बसविण्यात येत आहेत. यापैकी 22 सिस्मोमीटर उच्च-गती मार्गिकेवरील ट्रॅक्शन सबस्टेशन आणि स्विचिंग पोस्ट्सवर बसविले जातील, तर 6 अतिरिक्त अंतर्गत भू-भागावरील सिस्मोमीटर महाराष्ट्र आणि गुजरातमधील भूकंपप्रवण क्षेत्रांमध्ये बसविले जातील.
या 28 सिस्मोमीटरपैकी 12 सिस्मोमीटर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, खेडा, रत्नागिरी, लातूर आणि पांगरी परिसरात बसविले जातील, तर 16 सिस्मोमीटर गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, महेमदाबाद, अहमदाबाद, अडेसर आणि जुना भुज परिसरात बसविले जातील.
स्मार्ट आणि सातत्याने निरीक्षणाखाली असलेले जाळे
संपूर्ण विद्युत जाळे केंद्रीकृत नियंत्रण केंद्रातून रिअल-टाइम देखरेखीखाली ठेवले जाईल. उच्च-गती ट्रेनची सुरक्षित आणि विश्वासार्ह कार्यप्रणाली सुनिश्चित करण्यासाठी स्वयंचलित संरक्षण प्रणाली सेकंदाच्या अंशात प्रतिसाद देतील.
संबंधित प्रतिमा